“कोरोना” अवघ्या जगाला परिचित झालेला हे नाव कुठला महत्कार्य करणाऱ्या आसामी चे नसून जगभरात थैमान घालत असलेल्या विषाणूचे आहे. मूर्ती लहान पण व्याप्ती महान, अमेरिकेतील वॉशिंग्टन च्या व्हाईट हाऊस पासून ते जपान च्या टोकियो पर्यंत, आफ्रिकेतील घाना पासून जर्मनी च्या फ्रँकलिन पर्यंत. इटलीच्या रोम पासून इराण च्या तेहरान पर्यंत आणि चीन च्या बीजिंग पासून आपल्या पुण्या मुंबईपर्यँत हैदोस घातलाय ह्याने. अतिशय समृद्ध , वैज्ञानिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत अशा राष्ट्रांना देखील भंडावून सोडणार हा विषाणू आज आपल्या दारावर उभा टाकलाय.
जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणजे मन असते हे मी लहानपणी ऐकलं होता “क्षणात इथे अन क्षणात तिथे” पण त्यांनतर दुसरी वेगवान गोष्ट म्हणजे “कोरोना विषाणू” हे मला आता कळतंय.अवघ्या चार महिन्यात चीन, दक्षिण कोरिया, सिंगापोर, अमेरिका, कॅनडा, इटली, इराण, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, घाना, दक्षिण आफ्रिका, आखाती देश फिरून आज भारताला पण वेठीस धरण्यासाठी आलाय. जगभरातील १०००० पेक्षा जास्त लोकांना मृत्यूशय्येवर लोळवून, लाखोंना बाधित करून, अवघ्या व्यवस्थेलाच ह्याने आज परीक्षेस उतरविले आहे. जात-पात , धर्म -पंथ, देश-राज्य यांच्या सीमांमध्ये अडकून पडलेल्या समाजासमोर आज २१ व्या शतकातील सर्वात मोठे मानवतावादी संकट उभे आहे.
पार्श्वभूमी
आजपर्यंत जेवढी माहिती उपलब्ध आहे त्यावरून हेच कळत कि ह्याचा उगम चीनमधील वूहाण ह्या शहरात झाला. “वुहान” चीनमधील वैद्यकीय शिक्षणाचं माहेरघर. जैविक शास्त्राच्या अनेक प्रयोगशाळा येथेच वसलेल्या आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर १९ मध्ये चीन मध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली. पण अनेकांना प्रश्न असा पडतो कि ह्याची सुरुवात चीन मध्येच का झाली ? ह्याच उत्तर द्यायचं म्हणल्यास दोन बाजूंचा विचार करावा लागेल.
१. जंगली प्राण्यांचा बाजार आणि सेवन
चीनमध्ये अनेक प्राणी / पक्षी / कीटक खाणारे आढळतात. स्वतःहून चालणारा प्रत्येक जीव खाण्यासाठीच असतो म्हणून “गेले लक्ष, केले भक्ष” हि त्यांची धारणा. आता ते काहीही का खातात ? ह्यावर वेगळा लेख लिहिता येईल. चीन सरकारच्या म्हणण्यानुसार वुहान येथील जंगली प्राण्यांच्या बाजारातून हा विषाणू मानवांमध्ये पसरला. एका अर्थी ह्यावर विश्वास ठेवता येत असला तरी ह्याचे ठोस पुरावे अजूनदेखील मिळाले नाहीत, त्यातच चीन सरकारची गोपनीयता आणि मौन अनेक शंका उपस्थित करते.
२. जैविक पयुद्ध (BioWarfare )
ज्या वुहान शहरात हा विषाणू पहिल्यांदा सापडला ते जैविक प्रयोगशाळांसाठी प्रसिद्ध आहे. बऱ्याच खुल्या माहितीच्या विश्वावर विश्वास असणाऱ्या पत्रकारांनी(Independent Journalism) हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याचा दावा केला आहे. पण सध्या त्याच्या खोलात जाण्याची आवश्यकता नाही कारण शत्रू समोर असताना त्याची जात शोधात बसण्यापेक्षा त्याच्याशी लढायचं कस हे महत्वाचं असता.
कोरोना विषाणू कसा पसरतो ?
याबाबत अद्याप ठोस माहिती नसली तरीही जगभरातील शास्त्रज्ञांचं एकमत आहे कि हवेद्वारे(हवेतील धूलिकण, मॉइश्चर) आणि पृष्ठभागावरून हा वेगाने पसरतोय. ज्या व्यक्तीला ह्याची लागण झाली आहे त्याच्या थुंकी, खोकला, शिंकेतून तो हवेत पसरण्याची शक्यता असते. दुसरा मार्ग म्हणजे, संक्रमित व्यक्तीने वापरलेल्या वस्तुमार्फत किंवा त्याने एखाद्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यास विषाणू तिथे स्थिरावण्याचा धोका निर्माण होतो. त्याच पृष्ठाभागाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने स्पर्श केला आणि तोच हात नाक, तोंड किंवा डोळ्याजवळ नेला तर तोही संक्रमित होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या विश्लेषणावरून हवेपेक्षा देखील अधिक संक्रमण हे पृषभागांवर स्पर्श केल्याने होत आहे.
शरीरावर प्रभाव
कुठल्याही इतर विषाणूप्रमाणे कोरोना विषाणू देखील शरीरातील पेशींवर हल्ला करतो आणि स्वतःची संख्या झपाट्याने वाढवतो आणि हे होण्यासाठी काही काळ लागतो त्यालाच “उष्णमायन कालावधी (Incubation Period)” म्हणतात. एकदा का हा कालावधीसंपला कि व्यक्तीमध्ये रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. हा कालावधी अनेक व्यक्तींसाठी वेगळा असू शकतो. आणि ह्या कालावधी मध्ये व्यक्ती इतर लोकांना संक्रमित करू शकते. साधारणतः कोरोना विषाणू चा Incubation Period हा १ तो १४ दिवसांचा असतो. हेच एक कारण आहे कि हा विषाणू इतक्या वेगाने पसरत चालला आहे.
बऱ्याच लोकांना संक्रमणामुळे तीव्र ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडथळा यांचा होऊ शकतो. अजून ह्या आजारावर कुठलीही लस किंवा औषध उपलब्ध नसले तरी याचा अर्थ असा नाही कि हा ब्रा होऊ शकत नाही. जगभरातील ३.३४ लाख लोकांपैकी ९८ हजार लोक ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. परंतु आबालवृद्धांनी आणि ज्यांना फुफुसाचे आजार आहेत अशा लोकांना ह्याचा धोका थोडा जास्त आहे.
कोरोना उद्रेकाचे टप्पे :
कोरोनाचा उद्रेक हा एका झटक्यात कुठेही झाला नाही तर जगभरातील अनेक देशात एक विशिष्ट पॅटर्न निरीक्षिला आहे. चीन-इतर देशांमधलक्या उद्रेकाला चार टप्यांमध्ये बिभागत येईल :
पहिला टप्पा (Stage One)
ज्या ठिकाणी याचा उगम झाला त्या देशातून सुरुवात होते. पण नकळत ते विषाणू त्यांच्यासोबत आणत असतात, जर पहिल्या टप्प्याचा विचार केला तर भारत सरकारने हा धोका वेळीच ओळखून चीनमधून येणाऱ्या प्रवाशाची स्क्रीनिंग आणि विविध चाचण्या घेण्यास सुरुवात केली होती, वस्तूतः भारतात कोरोना चा पहिला रुग्ण हा वुहान मधून भारतात परतला होता.
दुसरा टप्पा (Stage Two)
कोरोनाचा उद्रेक आता फक्त उगम झालेल्या देशापर्यंत मर्यादित राहिला नसून अनेक आखाती तसेच युरोपिअन देशांमध्ये याचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात या अनेक देशांमधून लोक भारतात येण्यास सुरुवात झाली. यामध्ये विशेषकरून दुबई, इटली, इंग्लंड, कतार, ओमान, स्पेन, फ्रान्स, अमेरिका, नेदरलँड यांचा समावेश होता. प्रभावी तपासण्याच्या अभावी आणि अपूर्ण तयारी मुळे इथून आलेले बेजबाबदार प्रवासी भारतात दाखल झाले होते. देशात दाखल झाल्यांनतर थोडे दिवस विलग न राहता त्यांनी सरळ देशांतर्गत प्रवास केला आणि विविध ठिकाणी स्थानिक लोकांच्या संपर्कात आले.
आता प्रश्न असा कि, इतके सारे लोक इतक्या सहजरित्या देशात दाखल कसे येऊ शकले ? सरकारी यंत्रणांच अपयश ह्याला कारणीभूत आहे. दुसरा टप्पा सुरु झाल्यांनतर अनेक देशांमधून प्रवासी देशात येत येत असताना नेमका किती मोठा आणि कुठला धोका येतोय याबाबदल यंत्रणा अगदी अनभिज्ञ राहिल्या. जेव्हा ह्या प्रवाशांनी रोगाची लक्षणे दाखवण्यास सुरुवात केली तेव्हा यंत्रणांनी सतर्क होऊन नवीन येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस विलगीकरणात (“Home Quarantine “) राहण्याच्या सूचना दिल्या. पण या वेळेपर्यंत बरेच लोक देशात येऊन ठेपले होते.
येथे संत तुकारामांच्या रचनेतील दोन ओळी लिहाव्या वाटताये
गाढव शृंगारिलें कोडे ।
काही केल्या नव्हे घोडे ।।
अगदी अशीच गत आम्हा भारतीयांची आहे. यंत्रणांनी सांगितलेला गांभीर्याने घेणं आमच्या हाडामांसातच नाही, आहे तो फाजील आत्मविश्वास. बाहेरून आलेल्या ह्या अनिवासी भारतीयांनी १४ दिवस विलगीकरणात न राहता लग्नसमारंभांना उपस्थिती लावणे, देशांतर्गत प्रवास, नातेवाईकांच्या भेटीगाठी घेणे सुरु केल्या. त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार केला तर नाही पण अनेक लोकांचे जीव बांधले. दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी ह्या स्थानिक लोकांनी जेव्हा लक्षणे दाखवण्यास सुरुवात केली तेव्हा ह्या भयंकर धोक्याची चाहूल सुरुवात झाली.
तिसरा टप्पा (Stage Three)
उद्रेकाच्या या तिसऱ्या टप्प्यात स्थानिक लोकांमध्ये लक्षणे आढळून येतात.प्रथमतः हे लोक बाहेरून आलेल्यांच्या संपर्कात आल्याचं कळून येत. ह्या टप्प्यात “Community Transmission” मध्ये स्थानिक लोक इतर स्थानिक लोकांच्या संपर्कात येतात आणि अशा लोकांनादेखील संसर्ग झाला ज्यांनी कुठेही प्रवास केला नाही किंवा बाहेरून आलेल्या आले नाही. याचा अर्थ विषाणू ने आता तळागाळात हातपाय पसरले आहे. दुर्दैवाची बाब हि कि आठवड्यापूर्वी ICMR (भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था) च्या अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं होत कि भारतात “Community Transmission” नजरेस आला नाही. परंतु हे अंशतः देखील सत्य नव्हते आणि हेच अधोरेखित करते कि सरकारी यंत्रणांना धोक्याची कल्पना नव्हती. अनेक विश्लेषकांच्या मते भारत ह्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला आहे. आज रुग्णांचे जे आकडे सरकार प्रसिद्ध करतंय त्यापेक्षा अधिक लोकांना याची लागण झालेली आहे. उद्या जर हा आकडा अचानक हजारोंच्या संख्येनं वाढला तरी नवल वाटायला नको.
चौथा टप्पा (Stage Four)
अतिशय भयावह, सगळ्या यंत्रणांना मोडीस काढणारा हा टप्पा. इटली, इराण यांसारख्या देशांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणारा हा टप्पा. या टप्प्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अनेक पटीने वाढत जाते. दवाखान्यांमध्ये तुडुंब गर्दी होते. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येतो,रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढल्याने प्रत्येकाला व्यवस्थित उपचार मिळेल याची ग्वाही देता येत नाही किंबहुना एवढ्या साऱ्या संख्येवर उपचार करण्याची क्षमता आरोग्य यंत्रणांमध्ये नाही. अशावेळी डॉक्टरांसमोर यक्षप्रश् राहतो, तो म्हणजे “कुणाला वाचवायचे ?” दवाखान्याची क्षमता मर्यादित असल्याने व्यक्तीच्या Survival chances वरून त्याला प्राधान्य दिल जात. याचाच अर्थ असा कि नाईलाजाने अनेकांना मरण्यासाठी सोडून सोडून द्यावं लागत. सध्या इटली आणि इराण मध्ये हेच होतंय. जर भारतात हि परिस्थिती उद्भवली तर काय होईल याचा विचार करून अंगावर शहारे येतात आणि जर भारताला ह्या टप्प्यात जायचं नसेल तर वेळीच शहरे आणि राज्ये बंद करायला हवीत. फक्त सरकारी उपाययोजनांवर अवलंबून न राहता नागरिकांनी सुज्ञपणा दाखवून स्वतःहून Social Distancing चा अवलंब करावा.
कोरोना चा धोका आणि निर्धास्त भारतीय लोक
कोरोनापेक्षाही देशाला मोठा धोका आहे तो ह्या निर्धास्त आणि फाजील आत्मविश्वासू लोकांपासून. विषाणू दिसत नसल्याने त्यांना या गंभीर परिस्थितीची थोडीदेखील जाणीव नाहीये. “बाप दाखव, श्राद्ध कर” म्हणजे लक्षण दिसलेच तरच रोग आहे, हि परिस्थिती आता नाहीये. एका अदृश्य शत्रूचा सामना लागणारा संयम अजूनही जनतेत दिसून येत नाही हीच क्लेशदायक बाब. फक्त आणि फक्त Social Distancing च संक्रमणाची साखळी तोडू शकते. परिस्थिती जैसे थे राहिली तर उद्या आपलाही इटली आणि इराण झाल्याशिवाय राहणार नाही.
युवावर्ग आणि कोरोनासंक्रमण
जगभरातील विश्लेषकांनी इटली, इराण, स्पेन, फ्रान्स येथील परिस्थितीचा अभ्यास केला, यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली तरुणाईला मोठ्या प्रमाणात झालेले संक्रमण. विशेषतः इटली मध्ये वयोवृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथील वयोवृद्ध वर्ग घरात असला तरी तरुणवर्ग अजूनही बाहेर फिरत होता. २१-३० वयोगटातील तरुणांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने ते संक्रमित झाले असले तरीही लक्षणे दिसण्यासाठी बराच वेळ लागतो. यादरम्यान हे तरुण अनेक वयोवृद्धांच्या संपर्कात आले आणि त्यांनाही संक्रमित केलं. हा युवावर्ग कोरोना विषाणूचा अक्षरशः वाहक बनला आहे. भारतातदेखील हीच परिस्थिती आहे. देशातील ३०-४० % तरुणांना ह्याची लागण झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ह्या उद्रेकाचा भयावह आकडा पुढील दोन आठवड्यात समोर येईल.
आज देशाच्या वयोवृद्धांना ह्या तरुणांपासून वाचवण्याची नितांत गरज आहे. तरुणांनो घरातून बाहेर पडू नका,तुम्हाला कोरोनामुळे काहीही होणार नाही असा तुमचा समज असला तरी तुमच्यामुळे बऱ्याच लोकांना बरच काही होऊ शकत.
समज – गैरसमज
कोरोना संक्रमणाबद्दल लोकांच्या मनात अनेक समाज आणि गैरसमज आहेतं, अनेक प्रश्न समाज माध्यमांवर अफवांचे पेव फुटले आहे. ह्या सगळ्या गोंधळात एक सुज्ञ नागरिक म्हणून वाचलेल्या सरळ सरळ विश्वास ठेऊ नका. प्रत्येक गोष्ट पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा. मी देखील काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
१) २२ मार्चच्या बंद मागे मोदींनी नक्षत्र पाहून दिवस निवडला ?
यात मलातरी काहीएक तथ्य वाटत नाही. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधानांनी एक अघोषित बंद ला सुरुवात केली. ह्यामध्ये नक्षत्र, उष्णता किंवा वैज्ञानिक प्रयोग यांचा काहीएक संबंध नाही.
२) लवंग टाकून गरम पाणी पिल्याने घश्यातील विषाणू मरतील का ?
प्रथमतः कुठलाही विषाणू शरीरातल्या एका भागात दबा धरून बसत नाहीत. अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना देखील शरीरातल्या पेशींवर हल्ला करतो स्वतःची संख्या वाढवतो. त्यामुळे घश्यात विषाणू साठण्याचा प्रश्नच येत नाही. लवंग टाकून पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल पण विषाणू मरतील हे चुकीचं.
३) २२ मार्चच्या बंद मुळे देशातील कोरोना विषाणू मरतील कारण त्यांना कुठल्या शरीरात प्रवेश मिळणार नाही.
पृष्ठभागावर कोरोना विषाणू किती काळ टिकतो याबाबत ठोस पुरावे अजूनदेखील सापडलेले नाहीत. त्यामुळे एका दिवसाच्या बंद मध्ये विषाणू मेले हे समजून बाहेर पडू नका.
४) उष्ण वातावरणात विषाणू जास्त काळ टिकाव धरू शकणार नाही ?
जर हीच परिस्थिती असती तर भारतात विशेषतः राजस्थान, तामिळनाडू राज्यात रुग्ण सापडले नसते. विषाणूने एकदा शरीरात प्रवेश केल्यावर बाहेरील तापमान कितीही असले तरीही काही एक फरक पडणार नाही.
५) संक्रमणापासून वाचण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय कोणता ?
साबणाने हात वारंवार धुणे आणि घराबाहेर न पडणे. बाहेरच्यांशी जितका जास्त संपर्क टाळाल तितका चांगला.
६) चीन आणि उत्तर कोरिया मध्ये कोरोनाग्रस्तांना सरळ सरळ गोळीने उडवण्यात येत किंवा समुद्रामध्ये बुडवताये ?
असत्य. २१ व्या शतकात अशा एक काहीएक तथ्य नाही. विविध पाश्चात्य, भांडवलशाहा आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून हा अपप्रचार चालवण्यात येत आहे.
७) या उद्रेकासाठी चीनला जबाबदार ठरवण्यात यावं का ?
आणीबाणीच्या या प्रसंगी स्वतःला वाचवणं गरजेचं आहे. याला जबाबदार कोण ह्यावर संशोधन करण्याची हि वेळ नव्हे. पण एका अर्थी चीन ने ज्या प्रकारे माहिती लपवली आणि अन्य देशांना याबाबतीत अनभिज्ञ ठेवला त्या जबाबदारीपासून त्यांना पळ काढता येणार नाही.
पंतप्रधानांपासून माझ्या अपेक्षा
या गुरुवारी संध्याकाळी देशाच्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून संबोधन केले. त्यात नवल वाटण्यासारखं नसला तरी बऱ्याच अपेक्षा होत्या. सामान्य माणूस, कष्टकरी कामगार वर्ग, आरोग्य कर्मचारी ह्यांच्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी संध्याकाळी ५ वाजता टाळ्या वाजविण्यास सांगण्यात आले. आताच वेळ आहे कठोर उपाययोजना करण्याची, नाहीतर हा उद्रेक महामारी बनण्यास वेळ लागणार नाही.
नौजवान भारत सभेने प्रसंगी सरकारकडे केलेल्या मागण्यांचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो :
१. साथीच्या काळात प्रत्येक कष्टकरी कामगाराला सक्तीची सुट्टी मिळायला हवी.
२. ज्यांचे काम बंद झाले त्यांना उदरनिर्वाह भत्ता मिळायला हवा.
३. सॅनिटायझर , पाणी यासारखया स्वचछतेच्या सुविधा घरपोच आणि मोफत दिल्या पाहिजे.
४. साथीच्या काळात सरकारने भव्य स्तरावर निरोगी लंगर चालवून सर्व कष्टकरी कामगारांना घरपोच अन्न पोहोचवले पाहिजे.
५. सर्व खाजगी दवाखान्यांना तात्पुरते ताब्यात घेऊन तेथे कोरोनाचा मोफत उपचार करा.
६. मोठ्या प्रमाणात निरोगी वाटणाऱ्या लोकांच्या चाचण्या करून आजाराच्या प्रसाराचा खरा अंदाज घ्यावा.
७. आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती व्हावी.
८. उत्तर-पूर्व भारतीयांविरोधात होणाऱ्या भेदभावाविरुद्ध कडक कारवाही व्हावी.
९. संपूर्ण आरोग्यसेवेच राष्ट्रीयीकरण करा.
वेळ अजून देखील गेलेली नाही, कृपया आपल्या घरात थांबा. स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका.
– संकेत उंचे
https://twitter.com/unchesanket
https://twitter.com/unchesanket
This is good and informative. Keep it up
सत्य माहिती। आणि सरकार कडून ज्या अपेक्षा आहेत त्या पण सुजान नागरिक या नात्याने बरोबर वाटतात।